मुलीनेच संपविला होणारा नवरा! लोहगडावरील घटना खून असल्याचा उघडकीस

लोणावळ्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावरून पडून व्यावसायिक केतन अग्रवाल या तरुणाचा झालेल्या मृत्यूप्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक खुलासा समोर आला आहे. हा अपघात नसून एक पूर्वनियोजित कट रचून केलेली हत्या असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. केतनच्या होणाऱ्या पत्नीनेच आपल्या मित्राच्या मदतीनं त्याला दरीत ढकलून दिल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया गोयल हिला केतन अग्रवालसोबत लग्न करायचं नव्हतं. हा विवाह तिला मान्य नसल्यामुळे तिने केतनला वाटेतून हटवण्याचा भयानक कट रचला. यासाठी तिने आपल्या एका मित्राची मदत घेतली. ठरलेल्या कटानुसार, केतनला लोहगड किल्ल्यावर नेण्यात आलं आणि तिथे योग्य संधी साधून सियाने आपल्या मित्रांच्या मदतीने केतनला थेट खोल दरीत ढकलून दिल्याचा आरोप आहे. यात केतनचा जागीच मृत्यू झाला.मृत केतन अग्रवाल हा प्रसिद्ध व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा होता. त्याचं लग्न मार्केटयार्डातील मसाल्यांचे मोठे व्यापारी गोयल यांची कन्या सिया गोयल हिच्याशी ठरलं होतं. या दोन्ही मोठ्या व्यावसायिक कुटुंबांमध्ये हा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडणार होता. जयपूर येथे या ‘बिग फॅट वेडिंग’चं आयोजन करण्यात आलं होतं. या लग्नासाठी चक्क दोन विमानं देखील बूक करण्यात आली होती. मात्र, या भव्य लग्नाआधीच हा धक्कादायक अंत झाला



