
शहर प्रतिनिधी |
महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतून एक खळबळजनक आरोप समोर आला आहे. सुषमा शेलार यांनी शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाबुस्कावर यांच्यावर गंभीर आरोप करत, शरीर सुखाची मागणी पूर्ण न केल्यामुळे महापालिका निवडणुकीचे तिकीट कापण्यात आले, असा दावा केला आहे.
सुषमा शेलार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, “जे दाखवायचं ते दाखवत नाहीस, असा दबाव टाकण्यात आला. अन्यायकारक मागणी मान्य न केल्यामुळेच मला डावलण्यात आले.” या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, या आरोपांवर अद्याप माजी आमदार गौतम चाबुस्कावर किंवा शिवसेनेच्या अधिकृत नेतृत्वाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, हा प्रकार गंभीर असून याची चौकशी व्हावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.
या प्रकरणामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला अडचणीत आणणारी परिस्थिती निर्माण झाली असून, पुढील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.



