खांदेशराजकारणसमाजकारण

जळगावात भाजपचा विसरभोळा आमदार! घराणेशाहीचा नियम विसरून मुलाला केलं बिनविरोध नगरसेवक

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे आमदार राजुमामा भोळे यांच्यावर घराणेशाहीला खतपाणी घातल्याचा आरोप होत आहे. पक्षाकडून वारंवार घराणेशाहीविरोधी भूमिका मांडली जात असताना, त्याच भाजपच्या आमदाराने आपल्या मुलाला बिनविरोध नगरसेवक करून घेतल्याने राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे.

महानगरपालिका निवडणुकीत संबंधित प्रभागातून आमदार भोळे यांच्या मुलाचा उमेदवारी अर्ज दाखल होताच इतर उमेदवारांनी माघार घेतली. परिणामी कोणतीही लढत न होता त्यांच्या मुलाची बिनविरोध निवड झाली. या घटनेनंतर भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत असून, “घराणेशाहीविरोधी भूमिका ही केवळ भाषणापुरतीच आहे का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे, भाजपकडून सातत्याने काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर पक्षांवर घराणेशाहीचा आरोप केला जातो. मात्र जळगावातील या घटनेमुळे भाजपच्याच भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांना संधी न देता थेट मुलालाच बिनविरोध नगरसेवक बनवण्यामागे नेमका कोणता दबाव होता, असा सवालही उपस्थित होत आहे.

या प्रकरणावर आमदार राजुमामा भोळे किंवा भाजप जिल्हा नेतृत्वाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र ही बाब समोर आल्यानंतर जळगावच्या राजकारणात घराणेशाही विरुद्ध कार्यकर्ते असा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »