आयुष्यात कितीही फेल झाला तरी उभा कसं रहायचं हे शिकवणारे प्रवीण मसाल्याचे मालक “हुकमीचंद चोरडिया”
“प्रविण मसाले”ची यशोगाथा…
आयुष्यात कितीही फेल झाला तरी उभा कसं रहायचं हे शिकवणारे “हुकमीचंद चोरडिया”
अत्यंत फाटकं असणारं आयुष्य, प्रचंड गरिबी, धंद्यात येणारं अपयश या सर्वांवर मात करत त्यांनी हा ब्रॅण्ड उभारला ही त्याचीच गोष्ट…
गोष्ट आहे १९५० च्या दशकातली.
पुण्यात एक मारवाडी कुटुंब राहत होतं. या कुटुंबाचा मिरचीच्या बियांचा धंदा. घरात खाणारी तोंड भरपूर मात्र त्यातलं मोठं पोरगं मात्र भरपूर चळवळया. ‘हुकूमीचंद चोरडिया’ असं या पोराचं नाव. त्याला खूप मोठं व्हायचं होतं. खूप पैसा कमवायचा होता.
धडपड्या असल्याने त्याने अनेक धंदे सुरू करून बघितले. लाकडाची वखार काढली, हॉटेल तसंच किराणा मालाचं दुकान टाकून बघितलं. पण यांपैकी काहीच चाललं नाही. ढिगभर कर्ज झालं. देणेकऱ्यांचा ससेमिरा पाठीमागे लागला. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत निर्माण झाली होती, मात्र तरीही हा पोरगा काही हार मानणाऱ्यांपैकी नव्हता.
हुकूमीचंद मिरचीच्या बिया गोळा करण्यासाठी महाराष्ट्रभर फिरायचे. प्रत्येक ठिकाणी त्यांची व्यावसायिक नजर नव्या धंद्याचा शोध घ्यायची. महाराष्ट्रभरच्या या भटकंतीत एक गोष्ट त्यांना सगळीकडेच कॉमन दिसली.
ती गोष्ट म्हणजे ‘गावातल्या बाजारात मसाला विकणाऱ्याकडे होणारी गर्दी’.
चोरडीयांच्या नजरेने ही गोष्ट हेरली आणि त्यातूनच त्यांना एक आयडिया सुचली. त्यांनी काय केलं तर ‘कांदा लसूण’ मसाल्याचं सॅम्पल घेतलं आणि ते आपल्या बायकोला दाखवलं. त्यांच्या पत्नी कमलाबाई. त्या पडल्या कट्टर जैन धार्मिक. कांदा आणि लसूण या दोन्हीही गोष्टी घरात वर्ज्य होत्या. मग मसाला बनणार तरी कसा…?
हुकूमीचंद होते हट्टी. त्यांनी कर्मालाच ‘धर्म’ मानलं आणि बायकोची समजूत काढायला सुरुवात केली.
शेवटी कमलाबाई तयार झाल्या. मात्र मसाला बनवणं काही सोपं काम नव्हतं. पण हुकूमचंद जिद्दीला पेटले होते. त्यांनी बायकोला साथीला घेतलं आणि पाहता-पाहता मसालाच बनवून टाकला.
नवरा बायकोने मोठ्या कष्टाने बनवलेला मसाला विक्रीसाठी म्हणून एका दुकानदाराकडे ठेवण्यात आला. विशेष म्हणजे ग्राहकांना देखील तो आवडला. सुरुवातीचे काही दिवस स्वतः हुकुमीचंदांनी देखील आपल्या सायकलवरून घरोघरी जाऊन मसाल्याची विक्री केली.
जसजसे दिवस गेले तसतसे या मसाल्याला ग्राहकांची मागणी वाढू लागली आणि आपल्या छोट्याशा घरात कमलाबाईच्या कष्टांनी आणि हुकूमीचंद यांच्या बिझनेस माईंडच्या जोरावर सुरु करण्यात आलेला हा व्यवसाय नावारूपास येऊ लागला.
व्यवसायात जम बसल्यानंतर १९७१ साली हडपसर येथे कारखाना सुरु करण्यात आला. व्यवसाय विस्तारायला लागला आणि ‘प्रवीण मसाले’ हे नाव महाराष्ट्रातल्या घराघरातील किचनमधली अनिवार्य घटक बनलं.
महाराष्ट्रात ‘प्रवीण मसाले’ हे नाव गाजत असतानाच ‘सूहाना’ या ब्रँडखाली तो देशातील इतर भागातच नव्हे तर परदेशात देखील जाऊन पोहोचला.
सद्यस्थितीत जवळपास २५ देशात ‘प्रवीण मसाला’ वापरला जातो. त्यांचं वार्षिक उत्पन्न जवळपास ३०० कोटी इतकं आहे.
व्यावसायिक यशासाठी हुकूमीचंद यांनी एकच ट्रिक वापरली. त्यांनी कधीही क्वालिटीशी तडजोड केली नाही. वेळोवेळी आपल्या ग्राहकांकडून फीडबॅक घेत मसाल्यात योग्य ते बदल केले आणि मसाल्यांची चव ग्राहकांच्या जिभेचा कसा ताबा घेत राहील याची काळजी घेतली.
पुढच्या काळात एकाचे चार कारखाने झाले.
मसाल्याच्या व्यवसायातील ६ दशकांच्या कारकिर्दीतील प्रवासात त्यांना अनेक संकटांना सामोरे जायला लागलं. पण या संकटांचा त्यांनी धैर्याने सामना केला. त्यातून मिळणाऱ्या धड्यातुनच ते शिकत गेले.
अखेर वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांचा हा प्रवास थांबला..