पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशाला संबोधन

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील नागरिकांना संबोधित करताना महत्त्वपूर्ण घोषणा केली. उद्यापासून देशात लागू होणाऱ्या नव्या जीएसटी कर रचनेबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
मोदींनी सांगितले की, आता अनेक जीवनावश्यक वस्तूंवर कोणताही कर लागू होणार नाही. तर इतर वस्तूंवर केवळ ५ टक्के आणि १८ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. या बदलामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांनी देशवासीयांचे अभिनंदन केले.
याचबरोबर पंतप्रधानांनी अमेरिकेकडून भारतीय वस्तूंवर लावण्यात आलेल्या अतिरिक्त निर्यात शुल्काचा मुद्दा उपस्थित केला. अमेरिकेच्या या निर्णयाला प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारने स्वदेशी मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मोदी म्हणाले, “भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. आपली ताकद म्हणजे आपली लोकसंख्या आणि आत्मनिर्भरता. त्यामुळे आता प्रत्येक नागरिकाने स्वदेशी वस्तू खरेदी करण्याला प्राधान्य द्यावं.”
पंतप्रधानांच्या या घोषणेनंतर देशात करसवलतींसोबतच स्वदेशी वस्तूंना चालना मिळण्याची शक्यता आहे.