
‘माझ्यात आणि मामांमध्ये कुठेही दुरावा नाही. मी मामांच्या पुढे जाऊ शकत नाही, जाणारही नाही. हे माझे आयुष्यभराचे तत्त्व आहे’, अशा भावनिक शब्दांत आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या नात्यांची परखड मांडणी केली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात त्यांचे सख्खे मामा आहेत, याचा उल्लेखही त्यांनी विशेषत्वाने केला. गेल्या काही दिवसांपासून सत्यजित तांबे आणि माजी मंत्री थोरात यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या; मात्र या चर्चांना पूर्णविराम देत तांबे म्हणाले, की ‘माझ्या राजकीय महत्त्वाकांक्षेपेक्षा माझे कुटुंब, माझे नाते आणि त्यांचा सन्मान मला अधिक महत्त्वाचा वाटतो. मी कधीही कुटुंबाची रेषा ओलांडून राजकारण करणार नाही, हे मी राजकारणात प्रवेश करतानाच ठरवले आहे.